नागपूर : एकेकाळी राज्यात एक नंबरचा पक्ष असलेली काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकावर गेली आहे. येत्या काळात पुन्हा काँग्रेस नंबर १ होईल, एवढे आमदार निवडून आणायचे आहेत व त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, असा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. गेल्या काळात दबावापोटी अनेकजण पक्ष सोडून गेले. आता मोठ्या प्रमाणात घरवापसी होताना दिसेल, असा दावाही त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पटोले यांचे बुधवारी नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, सर्वच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतात. त्यात चुकीचे काहीच नाही. तसाच काँग्रेसलाही पक्षवाढीचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करताना पक्षश्रेठींनी प्रदेशची टीमही जाहीर केली आहे. येत्या कार्यकारिणीत ताकदीच्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. काँग्रेसचे मंत्री चांगले काम करीत आहेत. येत्या काळात मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल व त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविली जाईल. त्यांना लोकोपयोगी निर्णय घेण्याच्या सूचना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमधील गटबाजीबाबत छेडले असता गटबाजी मोदी- गडकरी, गडकरी- फडणवीस यांच्यातही असल्याचा चिमटा त्यांनी काढला.
तर वाराणशीतूनही लढणार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणशीतील नाहीत. पक्षाने आदेश दिला तर मी वाराणशीतूनही लढेल, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.
निधान परिषदेतील १२ नियुक्त्यांसाठी न्यायालयात जाणार
- महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या १२ जागांसाठी नावे निश्चित करून यापूर्वीच राज्यपालांकडे पाठविली आहेत. मात्र, राज्यपालांनी मोदी- शहा यांच्या दबावापोटी ती रोखून धरली आहेत. या विरोधात काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
पटोले म्हणाले....
- काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमसह मतपत्रिकेवर घेण्याचा कायदा करावा, अशी विनंती राहुल गांधी यांना भेटून केली आहे.
- लॉकडाऊच्या काळातील वीजबील कमी करून द्यावे, ही काँग्रेसची अपेक्षा आहे.
- सेलिब्रेटींच्या ट्वीटची चौकशी होतेय तर भाजपची आगपाखड कशासाठी ?
- उपमुख्यमंत्रीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होईल.
-