नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे (आयएमए) २०१९-२० वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आयएमए नागपूर शाखेचा दबदबा राहिला. स्थानिक शाखेचे उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून डॉ. कुश झुनझुनवाला आणि उत्कृष्ट सचिव म्हणून डॉ. मंजूषा गिरी यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. संजय देशपांडे यांना अतिविशेष कायार्साठी आयएमएचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट सीएमईसाठी नागपूर शाखेला पुरस्कार प्राप्त झाला.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा आणि राष्ट्रीय सचिव ए.आर. अशोकन यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी आयएमएचे पॅट्रन डॉ. अशोक अढाव, माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, डॉ. दत्ता, डॉ. जयेश लेले, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, सचिव डॉ. पंकज भांडारकर या प्रसंगी उपस्थित होते. राज्य पुरस्कारांवरही ‘आयएमए’ नागपूरने आपली मोहर उमटवली. राज्य ‘आयएमए’चा उत्कृष्ट अध्यक्ष हा पुरस्कार डॉ. कुश झुनझुनवाला यांना प्राप्त झाला. ‘मिशन ह्युमॅनिटी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित डॉ. आर.के. मेंडा फिरते चषक प्रदान करण्यात आले. आयएमए नागपूरचे पॅट्रन डॉ. अशोक अढाव यांना विशेषत्वाने गौरविण्यात आले. महाराष्ट्र आयएमएच्या प्रेसिडेंट अॅप्रिसिएशन पुरस्काराचे मानकरी डॉ. प्रकाश देव, डॉ. संजय देशपांडे, डॉ. झुनझुनवाला, डॉ. गिरी, डॉ. अर्चना कोठारी ठरले. कोरोना महामारीच्या काळात विशेषत्वाने कार्य करणाऱ्या नागपूर आयएमएला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव राजेश सावरबांधे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले.