नागपूर : पुणे येथील सृजन संस्थेच्यावतीने नुकतेच राज्यस्तरीय नुकतेच दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयाेजन केले हाेते. या स्पर्धेत नागपूरकर तरुणांनी बाजी मारली आहे. स्पर्धेचे पहिले दाेन्ही पारिताेषिक शहरातील गडकिल्ले निर्माण करणाऱ्या तरुणांच्या संस्थांना मिळाले आहे.
पुणे येथील नेहरू सभागृहात नुकताच या स्पर्धेचा पारिताेषिक वितरण साेहळा पार पडला. आमदार राेहित पवार यांच्या हस्ते नागपूरच्या किल्लेदार प्रतिष्ठानला प्रथम पारिताेषिक तर शिवप्रताप समूहाने द्वितीय बक्षीस प्राप्त केले. राज्यभरातून दहा हजारांहून अधिक स्पर्धक आणि तीनशे मंडळांनी सहभाग नोंदवला. किल्लेदार प्रतिष्ठानने यावर्षी किल्ले देवगिरी साकारला हाेता. या स्पर्धेत स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहचविण्यात आली हाेती. किल्लेदार प्रतिष्ठानचे विशाल देवकर, अभिषेक सावरकर, सुधांशू ठाकरे, शुभम तरेकर, पंकज वाघमारे आदींनी घेतलेली मेहनत फळाला आली. त्यांच्या किल्ले प्रतिकृतीला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला. किल्लेदार प्रतिष्ठानचे सदस्य गेल्या १२ वर्षापासून गडकिल्ल्यांच्या भव्य व हुबेहूब प्रतिकृती तयार करून इतिहासाला उजाळा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या कामगिरीने नागपूरची मान उंचावली आहे.