लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या २६ जानेवारीला झालेल्या उद्घाटनानंतर आलेल्या पहिल्या रविवारी नागपूरकरांनी याच प्रकल्पाच्या पर्यटनाला पसंती दिली. हजारी नागपूरकरांनी केलेल्या पर्यटनातून या प्रकल्पाला एका दिवसातच दीड लाख रुपयांचे उत्पादन झाले.
रविवारी सकाळपासूनच नागपूरकरांनी प्रकल्पातील पर्यटनासाठी गर्दी केली होती. अगदी रांगा लावून पर्यटकांनी येथील पर्यटनाचा आनंद सहपरिवार लुटला. गर्दी एवढी होती की, अनेकांना तिकीट न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले.
प्रकल्पाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीला झालेल्या उद्घाटनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २५९ पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आणि इंडियन सफारीचा आनंद लुटला. तर पहिल्याच रविवारी ६४२ पर्यटकांनी ही संधी मिळविली. यातून व्यवस्थापनाच्या खात्यामध्ये १ लाख ७८ हजार ३४० रुपये जमा झाले. व्यवस्थापनाने पर्यटकांसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही सुविधा ठेवल्या होत्या. रविवारीच ५२७ पर्यटकांनी बुकिंग केले होते, तर ९७ पर्यटकांनी ऑफलाइन सुविधेचा पर्याय निवडून सफारीचा आनंद घेतला. या एकाच दिवसात एसी प्रीमियम बसच्या १९ आणि नॉन एसी बसच्या ६ फेऱ्या झाल्या. अनेक पर्यटकांना ‘राजकुमार’ वाघाचे आणि अस्वलीचे दर्शन घडले. मात्र बिबट्याचे दर्शन सहजपणे घेता आले नाही.