- योगेश पांडे नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन २१ ते २३ मार्चदरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू येथे करण्यात आले आहे. संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आले आहे. या सभेत शताब्दी वर्षात संघाने पुढील कालावधीसाठी निश्चित केलेले पंच परिवर्तनाचे बिंदू व विस्तारावर मंथन होणार आहे.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. २१ ते २३ मार्चदरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहिम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्द्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरीता मंथन होणार आहे. संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, सभेअगोदरदेखील विविध स्तरावरील बैठका होणार आहेत. यात केंद्रीय टोळी बैठक, कार्यकारी मंडळ बैठक, प्रांत प्रचारकांची बैठक यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
सरसंघचालक, सरकार्यवाह राहणार उपस्थिततीन दिवसीय चालणाऱ्या या सभेला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह १ हजार ४०० प्रतिनिधी उपस्थित राहतील.
ऐतिहासिक ठरणार प्रतिनिधी सभासंघस्थापनेचे शताब्दी वर्ष सुरू आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठीच्या कृती आराखड्यावर चर्चा होईल आणि विविध मुद्द्यांवर विचारमंथन होईल. तसेच, २०२५-२६ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा बैठकीत निश्चित केली जाईल. यामध्ये, संघाच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी एक चौकट तयार केली जाईल. यावर्षी बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्वलंत मुद्द्यांवर देखील चर्चा होणार आहे.