नागपूर :नागपूरमध्ये लवकरच ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू होत आहे, ज्यामुळे प्रवाशांना दळणवळणाचा एक नवीन, प्रदूषण कमी व स्वस्त पर्याय मिळणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने या सेवेसाठीचे भाडे निश्चित केले आहे, त्यानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी केवळ १५ रुपये मोजावे लागतील. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १०.२७ रुपये भाडे आकारले जाईल. मुंबईमध्ये ही सेवा सुरू झाली आहे.
एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य परिवहन प्राधीकरणाने ‘महाराष्टÑ बाईक-टॅक्सी नियम २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाºया इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या भाडेदरात एकसूत्रता आणण्यासाठी खटुआ समितीने आॅटोरिक्षांचे भाडेदर ठरविण्यासाठी निश्चित केली पद्धत विचारात घेऊन ही भाडेदर ठरविण्यात आली आहे. हे भाडेदर संपूर्ण राज्यासाठी लागू राहणार आहे. भाडेदराचा पूर्नविचार एक वर्षानंतर करण्यात येईल असेही निर्देश देण्यात आले आहे. प्राधिकरणाने उबर इंडिया सिस्टीम प्रा.लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि., अॅनी टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांना ३० दिवसाकरीता 'मुंबई महानगर क्षेत्राकरीता' तात्पुरता परवाना देण्यास मान्यता दिली आहे. तसेच, सर्व बाबींची अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती आरटीओच्या एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली.
पिवळ्या रंगात असणार ‘बाईक टॅक्सी’
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी या पिवळ्या रंगाचा असणार आहेत. त्यावर बाइक-टॅक्सी असे लिहिणे, दुचाकी-टॅक्सीवर सेवा-प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. चालकाचे वय २० वर्षांहून अधिक व ५० वर्षांपेक्षा कमी असावे आदी नियमही घालून देण्यात आले आहे. ज्याला बाइक टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्याकडे किमान ५० इलेक्ट्रिक बाइक असणे आवश्यक आहे. त्याला राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येणार आहे. या परवान्याची वैधता पाच वर्षांची असेल.
एकावेळी एकच प्रवाशी
प्रवाशांचा सुरक्षतेसाठी बाइक टॅक्सीमधून एकावेळी एकाच प्रवाशाला घेऊन जाता येणार आहे. १२ वषार्खालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाइक टॅक्सींना प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविण्याण्याचा नियम आहे. जीपीएस ट्रॅकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवासी यांकरिता हेल्मेट बंधनकारक असणार आहे. अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.