नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएमआरसीएल) विकासात आणखी भर पडली आहे. नागपूर मेट्रो रेल्वेची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. या कंपनीच्या संचालकांची पुढील आठवड्यात बैठक होणार असून प्रकल्पाच्या विकासाची रूपरेषा ठरणार आहे. ‘एनएमआरसीएल’च्या नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे कंपनी रजिस्ट्रारकडे अर्ज केला होता. केंद्र आणि राज्य सरकारने याआधीच नागपुरातील मेट्रो रेल्वे कामांच्या खर्चासाठी मंजुरी दिली आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीला आधीच उशीर झाला आहे. त्याच कारणांमुळे कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक अद्याप होऊ शकली नाही. नोंदणीसाठी ‘एनएमआरसीएल’ने तीन कोटींचे नोंदणी शुल्क भरले आहे. कंपनीची नोंदणी झाल्यामुळे आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना वेग येईल, असे सूत्रांनी सांगितले.या प्रकल्पाचे उद्घाटन आॅगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे ३८.१२५ कि़मी.चे दोन कॅरिडोअर प्रस्ताविक केले आहेत. शंकर अग्रवाल हे कंपनीचे चेअरमन असून बृजेश दीक्षित व्यवस्थापकीय संचालक आहेत. (प्रतिनिधी)
कंपनी कायद्यांतर्गत नागपूर मेट्रोची नोंदणी
By admin | Updated: February 16, 2015 02:14 IST