- सुमेध वाघमारे नागपूर - मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणा-यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यप्रदेशातील एका शेतक-याचे नागपुरात अवयवदान झाले. यामुळे तिघांना नवे जीवन तर दोघांना दृष्टी मिळाली.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. सवाई हे व्यवसायाने शेतकरी होते. शेतातील काम करून करून घरी परत येत असताना दुचाकीवरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. प्रथम उपचाराकरिता पांढूर्णा येते नेण्यात आले. परंतु प्रकृती खालवल्याने त्यांना १४ आॅगस्ट रोजी नागपूरच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’त (एम्स) दाखल केले. तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. ‘एम्स’चे अवयव प्रत्यारोपण समन्वयक प्रितम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी सवाई यांच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. पत्नी राधिका व मुलगा विशाल सवाई यांनी अवयवदानासाठी होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी ‘झेडटीसीसी’च्या यादीनुसार गरजू रुग्णांना दोन किडनी, लिव्हर आणि कॉर्निआचे दान केले.