नागपूर: गत काही दिवसांपासून सातत्याने घसरणाऱ्या तापमानामुळे नागपूर शहर गारठले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पारा किंचित वर सरकला असला तरी आकाशात ढगांनी गर्दी केल्याने थंडीची तीव्रता मात्र कायम आहे.शहरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे याच काळात किमान तापमानात कमालीची घट होत असल्याने शहर गारठले आहे. दोन दिवसांपूर्वी शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरले होते यावरून थंडीच्या तीव्रतेची प्रचिती यावी. त्यानंतर दोन दिवसात तापमानात किंचित वाढ होत गेली. शनिवारी नागपूरमध्ये सायं.पर्यंत किमान तापमान ८.५ अंश ( सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी) नोंदवण्यात आले. मात्र गार वारे व ढगाळी वातावरणामुळे थंडीचा जोर कायम आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले कुडकुडतच बाहेर पडू लागली तर उद्यानात ‘मॉर्निंग वॉक’ ला येणाऱ्या वृद्धांची संख्याही रोडावली आहे. थंडीपासून संरक्षणासाठी नागरिक स्वेटर, मफलर, उलनच्या शाली घेऊनच बाहेर पडत आहे. रात्रीच्या वेळी पदपथच आश्रयस्थान असणाऱ्यांचे या थंडीमुळे कमालीचे हाल होत आहे. पुढच्या दोन दिवसात थंडीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
नागपूर गारठले
By admin | Updated: December 21, 2014 00:11 IST