नागपूर : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान चहा- बिस्किट न मिळाल्याने शस्त्रक्रिया न करता निघून गेलेल्या डॉक्टररील कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. संबंधिताचा माफीनामा असला तरी आरोग्य विभागाने ही बाब अक्षम्य असल्याची टिपप्णी नोंदविली आहे.
मौदा येथील खात आरोग्य केंद्रातील ३ नोव्हेंबरला महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया सुरु असताना आरोग्य अधिकारी डॉ. तेजराम भलावी यांनी चहा न मिळाल्याने भूल दिलेल्या महिलांवर शस्त्रक्रीया न करता निघून गेले होते. यावर भलावी यांना विभागाने स्पष्टीकरण मागितले होते. यावर त्यांनी प्रकृती बरी नसल्याने आपण गेलो होतो, परंतु काही वेळाने परत येऊर आपण शस्त्रक्रिया पूर्ण केल्या, झाल्या प्रकाराबाबत आपण शस्त्रक्रियेस आलेल्या महिला व त्यांच्या नातेवाइकांची माफी मागतो, अशी लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे.
डॉ. भलावी हे आठ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी भारती नितेश कानतोडे (रा. पाहणी), प्रतिमा प्रमोद वारई जिल्हh(रा. ढोलमारा), करिश्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनीता योगेश झांजोडे या चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली. परंतु वेळेवर चहा न मिळाल्याने भलावी प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले होते. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला ताटकळत राहिल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तीन सदस्यीय समिती स्थापन केली.
भलावी यांनी या समितीपुढे माफीनामा सादर केला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी दहेगाव रंगारी येथून शस्त्रक्रिया पूर्ण करून आलो होतो. आपल्याला मधुमेह असून रक्तशर्करा कमी झाल्याने वेळेवर चहा व बिस्किटे घ्यावी लागतात. ती न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने परत जावे लागले. आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाइकांना झालेल्या त्रासाबाबत आपण माफी मागत आहोत, असे स्पष्टपणे डॉ. भलावी यांनी नमूद केले आहे.