अकोला : वेगळ्या विदर्भाची मागणी घेऊन विदर्भ फेडरेशन समितीच्या वतीने ५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी दिली. या पदयात्रेत १00 विदर्भप्रेमी सहभागी होणार असून, पदयात्रा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या पाच राज्यातून जाणार आहे. १,0५0 किमीचा प्रवास २८ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती व्हावी व सरकारला विदर्भातील नागरिकांच्या भावना कळाव्या, याकरिता ही पदयात्रा काढण्यात येत आहे. ५ सप्टेंबर रोजी नागपूर येथील व्हेरायटी चौकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी आतापर्यंत अनेकदा विविध संघटना व राजकीय पुढार्यांकडून करण्यात आली. मात्र, त्याला फारसे बळ मिळाले नाही. वेगळ्या विदर्भाला विरोध करणारे शिवसेना व काँग्रेसचे नेते यांची शक्ती जास्त होती. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्या सर्व संघटनांना एकत्र करून विदर्भ फेडरेशन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना अराजकीय आहे. तसेच या संघटनेचा कुणीही अध्यक्ष नाही. २0१0 पासून या संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहे. नागपूर करारानुसार जो वाटा विदर्भाला मिळायला हवा होता तो मिळाला नाही. या कराराची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी वाढत आहे. सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचे कोंडबत्तूनवार यांनी सांगितले. यावेळी भाऊराव बघेल, गणेश पोटे, अहमद कादर उपस्थित होते.
वेगळ्या विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पदयात्रा
By admin | Updated: August 22, 2014 00:39 IST