गिरीश कर्नाड लिखित नाटक : फर्स्ट बेल आॅन स्टेजचे सादरीकरण नागपूर : नाट्य कार्यशाळांमधून नाट्याभिनय आणि नाटकांचे तंत्र समजून घेणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांनी भव्यदिव्य काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडल’ नाटकाचे आव्हान वाटले. या नाटकाचा अभ्यास केला आणि त्यासाठी काय दम लागणार याची जाणीव झाली. पण सर्वच कलावंतांनी सचोटीने प्रयत्न करून हे आव्हान पेलले आणि नागमंडलचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शहरातील युवा रंगकर्मींनी ‘फर्स्ट बेल आॅन स्टेज’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शहरातील रंगकर्मींचे सादरीकरण आणि नवनव्या नाटकाच्या फॉर्मला समजून घेण्याचा, त्यांना अभ्यासण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहे. त्या अंतर्गतच नागमंडल या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. साई सभागृहात सादर झालेल्या या प्रयोगाला शहरातील तमाम रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी गर्दी केली. हा प्रयोग छिंदवाड्याच्या नाट्यगंगा संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. छिंदवाडा येथे नाट्य चळवळ फारशी जोरात नाही. पण येथील रंगकर्मींनी विविध शिबिरात नाट्यविषयक ज्ञान मिळविले आणि नागमंडलचा प्रयोग परिश्रमाने बसविला. त्यांच्या परिश्रमाची महती आणि सादरीकरणाचा दम माहीत असलेल्या नागपुरातल्या रंगकर्मींनी त्यांना आमंत्रित केले होते. या कलावंतांनी आत्मविश्वासाने हा प्रयोग सादर करून उपस्थितांची दाद घेतली. एका लोककथेवर आधारित आणि स्त्री-पुरुषांच्या एकनिष्ठतेच्या प्रश्नावर विचार मांडणारे नागमंडल हे केवळ कन्नड भाषेतीलच नव्हे तर भारतातील जवळपास सर्व मान्यताप्राप्त भाषेतून सादर केले गेले आहे. भारतातीलच नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेतीलही कित्येक विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागमंडलचा अभ्यासक्रमात समावेश असलेले नाट्य सादर करण्याचे धाडस या युवा मंडळींनी केले़ वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला स्पर्श करणारे हे नाटक दोन उपकथांद्वारे पुढे जाते. नाटकाची शैली लोककथेची असून ती साकारण्यात ही युवा मंडळी यशस्वी ठरली. केतन सोनी, अपूर्वा डोगरवाल, सोनल सूर्यवंशी, रचना, स्वाती चौरसिया, पवन नेमा, निकिता सोनी, विनोद ग्यास, हर्ष नागले, जगदीश वर्मा, सुधीर जैन, विजय गोळे, सचिन दुबे, नितीन जैन, नीतेश मंडराह, भरत गढेवाल, सोनू यादव व विक्की यादव यांनी नाटकात भूमिका केल्या आहेत.(प्रतिनिधी)
नागपूरकर कलावंतांनी पेललेले ‘नागमंडल’
By admin | Updated: June 12, 2014 01:19 IST