ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी (ता. काटाेल) येथील बसस्थानकाहून राेज अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बसेस धावतात. या बसेसच्या अनेक चालक व वाहकांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, बहुतांश चालक-वाहक नागपूरच्या बसफेऱ्यांवर जाण्यास धजावत नसल्याचे दिसून आले. नागपूर शहर व ग्रामीण भागातील वाढते काेराेना संक्रमण कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हे कर्मचारी राेज शेकडाे प्रवाशांच्या संपर्कात येत असून, त्यांना व त्यांच्यापासून इतर प्रवाशांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, प्रशासनाने त्यांच्या लसीकरणाबाबत अद्यापही सकारात्मक निर्णय घेतला नाही.
दुसऱ्या टप्प्यात नागपूर जिल्ह्या काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने, त्यांच्या मनात ही भीती निर्माण हाेणे स्वाभाविक आहे. तरीही काही चालक व वाहक नागपूरच्या बसफेऱ्यांवर कर्तव्य बजावत आहेत. राेज शेकडाे नागरिक बसने प्रवास करीत असल्याने दाेन्ही कर्मचारी राेज अनेकांच्या संपर्कात येतात. या प्रवाशांमध्ये काेण काेराेना पाॅझिटिव्ह आहे आणि काेण निगेटिव्ह आहे, हे कळायला मार्ग नसते. त्यामुळे वाहक संक्रमित हाेण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
काेंढाळी बसस्थानकाहून राेज औरंगाबाद, अकोला, शेगाव, बुलडाणा, परभणी, वाशीम, परतवाडा, आकोट, दर्यापूर, अंजनगाव (सुर्जी), अमरावती, कारंजा (लाड) यासह इतर लांब पल्ल्याच्या बसेस जातात. या सर्व बसफेऱ्या नागपूरला जाणाऱ्या व परत येणाऱ्या असतात. या बसफेऱ्यांवरील अनेक चालक व वाहकांचे काेराेना लसीकरण करण्यात आले नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेवरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने आरोग्य विभाग व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे सक्तीने काेराेना लसीकरण करवून घेतले आहे. मात्र, एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या बसचालक व वाहकांच्या लसीकरणाकडे कुणीही अद्याप लक्ष दिले नाही. त्यांना सुपर स्प्रेडर हाेण्यापासून वाचविण्यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक आहे, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.
...
प्रवासी ऐकेना
बसमधील जागा आधीच अरुंद असते. आता एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची मुभा असून, मास्कशिवाय प्रवाशांना आत प्रवेश दिला जात नाही. आत चढल्यानंतर अनेक प्रवासी मास्क काढतात. काही चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. वारंवार सूचना देऊनही ते मास्क व्यवस्थित करीत नाही किंवा लावत नाही. प्रसंगी हुज्जत घालतात, असेही वाहकांनी सांगितले. परिणामी, कमी वयाचे अनेक चालक व वाहक काेराेना संक्रमित झाले आहेत. त्यामुळे आपण नागपूर फेऱ्यांऐवजी ग्रामीण भागातील फेऱ्यांवर जाणे पसंत करीत असल्याचे वाहकांनी सांगितले.
....
काेराेना संक्रमणामुळे एसटी महामंडळाला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही झाला आहे. काेराेनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने उत्पन्नही घटले आहे. शासनाच्या निर्णयानुसार सध्या ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू आहे. काटाेल आगारात १३० चालक व १०१ वाहक आहेत. त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करणे सुरू आहे.
कुलदीप रंगारी,
आगार व्यवस्थापक, काटाेल.