लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकऱ्यांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची रेलचेल असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू खरेदी करून या सेवा संस्थांना मजबूत करण्याची संधी शहरवासीयांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन, राजेंद्रसिंह दिव्यांग कौशल्य विकास केंद्र, भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद, अभाविप आणि ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्ग, दीक्षाभूमी चौकातील मुंडले इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात या ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पांड्या, व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, उद्योजक सुरेंद्र लोढा, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, ब्लार्इंड रिलिफचे अध्यक्ष निखिल मुंडले, नागेश कानगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रत्येक दिवशी एक थीम ठेवण्यात आली असून, पहिल्या दिवशीची ‘दिव्यांग संमेलन’ ही संकल्पना होती. यानिमित्त अपघातात एक पाय गमावल्यानंतरही जिद्दीने एव्हरेस्ट सर करणारा अपंग गिर्यारोहक अशोक मुन्ने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगतातून आपला प्रवास उलगडला. यावेळी नंदा जिचकार यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिद्द आणि संघर्षाची अभिव्यक्ती म्हणजे ग्रामायण होय, असे मनोगत व्यक्त केले. जुन्या काळात ग्रामीण क्षेत्र श्रीमंत होते, कारण त्यांच्याकडे संभाव्य गोष्टी होत्या. ही समृद्धी पुन्हा जागे करण्याची गरज आहे, असे मत बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. कृषिमालावर प्रक्रिया करून उद्योजक १०० पट नफा कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिमालाच्या मोलाची जाणीव करून देणे गरजेचे असल्याची भावना सोहम पांड्या यांनी व्यक्त केली. संचालन संजय सराफ यांनी केले.