कळमेश्वर : तालुक्यातील ग्रामीण भागात जीवनन्नोती अभियानांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ विकसन माेहिमेला सेलू गावातून नुकतीच सुरुवात करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शनातून पोषण परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
आरोग्याची नियमित काळजी घेणे याला अनुसरून अन्न पोषण, आरोग्य व स्वच्छतांतर्गत स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच बाजारातून भाजीपाला विकत घेण्याचा खर्च कमी व्हावा, गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली-मुले व लहान मुलांना आहारातून पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन परसबाग निर्माण करण्याचे आवाहन खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांनी यावेळी केले. माझी पोषण परसबाग मोहीम खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक प्रशांत धोटे, प्रभाग समन्वयक रोशन लोधे, दिनेश टाले, अश्विनी वैद्य, ग्रामसेवक सुषम जाधव प्रयत्न करीत आहेत.