नागपूर : चार बुरखेधारी हल्लेखोरांनी तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी एका मोबाईल शॉपी मालकावर खुनी हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथे घडली. या घटनेने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली आहेत. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी काही काळ सीताबर्डी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. भारत ब्रिजलाल खटवानी (५०), असे जखमी दुकानदाराचे नाव असून ते जरीपटका भागातील सुबोधनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना धंतोलीतील शुअर टेक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत खटवानी हे आपल्या ‘हॅलो वर्ल्ड मोबाईल शॉपी’ नावाच्या दुकानात बसले असताना तोंडाला फडके बांधलेले चार जण अचानक हातात शस्त्रे घेऊन आले. साळसूदपणे दुकानात घुसून त्यांनी गल्ल्यावर बसलेले खटवानी यांच्यावर चौफेर हल्ला केला. हल्ला सुरू असताना दुकानातील ग्राहक आणि इतर नोकर घाबरून पळून गेले. खटवानी हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ते मृत झाल्याचा समज करून हल्लेखोर पसार झाले. परिसरातील लोकांनी त्यांना उपचारार्थ शुअरटेक इस्पितळात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह प्रचंड पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेने या भागात तणावाचे वातावरण पसरले होते. दुकानदारांनी आपपाली दुकाने बंद केली होती. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असून हल्लेखोर त्यात कैद झाले आहे. हल्लेखोर २५ ते ३५ वयोगटातील होते. त्यांना हुडकून काढण्यासाठी पोलिसांची चार पथके इतरत्र रवाना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मोबाईल शॉपी मालकावर खुनी हल्ला
By admin | Updated: March 8, 2015 02:22 IST