वर्षभरापासून होती लुटीची योजना : शशिकला ठाकरे हत्याकांडात दोघांना अटकनागपूर : शशिकला ठाकरे हत्याकांडाचा सूत्रधार मजूर एका वर्षापासून लुटीची योजना आखत होता. घटनेच्या दिवशी शशिकला यांना घरात एकटी असल्याचे पाहून त्याने आपली योजना अमलात आणली. परंतु शशिकला आपल्याला ओळखू शकते, त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने शशिकला यांचा खून केला. गुन्हे शाखा आणि सक्करदरा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. झोन चारचे डीसीपी जी. श्रीधर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. खुनाचा मुख्य सूत्रधार शिवप्रसाद ऊर्फ शिवा घनश्याम बागरे (३८) रा. संतोषीमाता नगर हुडकेश्वर आणि प्रवीण अशोक भांडारकर (२९) रामनगर, गोंदिया अशी आरोपीची नावे आहेत. ६५ वर्षीय शशिकला ठाकरे यांचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर ओमनगर येथे खून करण्यात आला होता. गळ््यावर कैचीने वार करून त्यांचा खून केला होता. घटनेच्या वेळी शशिकला यांचा मुलगा प्राध्यापक अमित आणि सून शुभांगी आपाल्या कामावर होते. दुपारी ३ वाजता नातू नचिकेत आणि नात आरोही घरी आल्यावर त्यांना आजीचा खून झाल्याचे लक्षात आले. शेजाऱ्यांच्या सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांना खून होण्यापूर्वी रेती उचलण्यासाठी आलेल्या मजुरांवरच संशय आला. पोलिसांनी शिवाच्या पत्नीला विचारपूस केली. तेव्हा तिने पती भंडारा येथे भावाकडे गेल्याचे सांगितले. पोलीस तातडीने भंडारा येथे त्याचा भाऊ राजू याच्याकडे पोहोचले. परंतु तिथे शिवा सापडला नाही. त्यामुळे पोलीस त्याचा भावाला घेऊन आले. दरम्यान शिवासोबत प्रवीणही असल्याचे पोलिसांना समजले. प्रवीण मूळचा गोंदियाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या चंद्रशेखर वॉर्ड येथील घरावरही पाळत ठेवली. मंगळवारी दोघेही भंडारा व गोंदिया येथे सापडले. पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. डीसीपी श्रीधर यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी शशिकला यांचा मुलगा अमितने घराचे काम सुरूकेले होते. अमितने संजय शरणागत नावाच्या ठेकेदाराला काम दिले होते. शिवा संजयकडे काम करीत होता. बांधकाम सुरूअसताना शिवाच्या मनात अमितच्या घरी चोरी करण्याचा विचार आला. घरातील एकूणच परिस्थितीची त्याला कल्पना आली. शशिकला दुपारच्या वेळी एकट्याच घरी असतात, त्यामुळे आपली योजना यशस्वी होईल, याची त्याला खात्री होती.घरातून मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोख रक्कम मिळण्याची त्याला अपेक्षा होती. यासाठी तो एका साथीदाराचा शोध घेत होता. शशिकला यांच्या घराचे काम संपल्यावर त्यांची मुलगी वैशाली यांच्या घराचे काम सुरू झाले होते. अमितने तीन चार दिवसांपूर्वीच शिवाला त्याच्या घरासमोरून रेती घेऊन जाण्यास सांगितले होते. घरी जाण्याची संधी मिळाल्याने तो कामाला लागला. २२ सप्टेंबर रोजी प्रवीणसुद्धा कामाच्या शोधात नागपुरात आला होता. शिवाची त्याच्यासोबत जुनी ओळख होती. त्याने प्रवीणला योजनेत सहभागी करून घेतले. योजनेनुसार दोघेही दुपारी १.३० वाजता शशिकलाच्या घरी पोहोचले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला फावडा मागवून रेती बोऱ्यांमध्ये भरली. शशिकलाने त्यांना २० रुपये दिले. त्यांना चहा पाजला. या दरम्यान १५ ते २० मिनिटे लोटली. शशिकला ते जाण्याची वाट पाहात होत्या. तर ते दोघेही चोरी कशी करायची, याचा विचार करीत होते. चोरी केल्यावर शशिकला आपल्याला ओळखत असल्याने आपण पकडले जाण्याची भीती शिवाला होती. त्याने प्रवीणलाही सांगितले. त्यामुळे त्याने तिचा खून करण्याचा इशारा केला. चहा घेतल्यानंतर शिवाने भूक लागल्यचे सांगून चिवडा मागितला. शशिकला चिवडा आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत जाताच दोघेही त्यांच्या मागे आले आणि हल्ला केला. शशिकला ओरडू लागल्या. त्यामुळे स्वयंपाक खोलीतून कैची आणून शशिकलाच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेतले. ते घरात दागिने व रोख रक्कम शोधू लागले. २० हजार रुपये त्यांच्या हाती लागले. दागिने व रुपये घेऊन ते फरार झाले. दोघांनीही दागिने व रुपये आपसात वाटून घेतले. प्रवीण खून केल्यानंतर इतवारी रेल्वे स्टेशनला पोहोचला. तेथून त्याने शिवाच्या पत्नीला फोन केला व शिवाबाबत विचारणा केली. परंतु तिच्याकडून काही माहिती न मिळाल्याने तो थेट रेल्वेने गोंदियाला निघून गेला.मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस अगोदर शांतिनगरला पोहोचले. त्यानंतर ते गोंदियाला गेले. प्रवीण हाती येताच पोलीस शिवाची वाट पाहू लागले. शिवाजवळ मोबाईल नव्हता. त्यामुळे तो भावाच्या घरी आल्यावरच हाती लागू शकत होता. त्यामुळे पोलीस त्याच्या भावाच्या घरी पोहोचले. तो घरी येताच त्यालाही पकडले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह आयुक्त संतोष रास्तोगी, अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा, एसीपी नीलेश राऊत, कापगते, निरीक्षक पी.एच. मुलानी, एपीआई ज्ञानेश्वर भेदोडकर, प्रदीप अतुलकर, विक्रांत हिंगणे, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेश ठवरे, सुरेशा हिंगणेकर, नूरसिंह दमाहे, धर्मेंद्र सरोदे, मनीष भोसले, अतुल दवंडे, मंगेश लांडे, शरीफ शेख आणि शेख फिरोज यांनी केली. (प्रतिनिधी) पुन्हा आला पाहणी करून गेलाशशिकला यांचा खून केल्यानंतर शिवा हिवरी येथे गेला. घटनास्थळाची माहिती घेण्यासाठी तो पुन्हा दुपारी ३ वाजता आला. सक्करदरा चौकात पोलीस ठाण्यापासून थोडे अंतरावर उभे राहून त्याने पाहणी केली. पोलिसांच्या गाड्या व नागरिकांची गर्दी पाहून तो परत गेला. शिवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. पत्नी एका डॉक्टरकडे कामाला आहे. पत्नीच्या भरवशावरच घर चालते. सीसीटीव्हीने मिळाले यश सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना २४ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपींना सुद्धा सीसीटीव्हीची कल्पना नव्हती.
ओळख लपविण्यासाठी केला खून
By admin | Updated: September 29, 2016 02:34 IST