लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आज बुधवारी सकाळी ९.३० ते ९.४५ वाजेपर्यत सायकलने कार्यालयात येतील.
नागपूरात वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. सायकलने कार्यालयात आल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, तसेच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल.
जास्तीत जास्त कर्मचारी व अधिकारी या मोहिमेत सहभागी होतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी व्यक्त केला. भोपाळ गॅस कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीत दरवर्षी २ डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दरवर्षी पाळण्यात येतो.
शहरातील नागरिकांनीही राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सायकल-दिवस’ पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या शहरातील काही स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होतील. तसेच दर महिन्यात किमान एक दिवस मनपाचे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.