सर्जिकल साहित्याचा व्यवहार :
१६ लाख रुपये हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्जिकल साहित्य विकणाऱ्या एका कंपनीच्या मुंबई आणि ठाण्यातील भागीदार महिलांनी नागपुरातील व्यापाऱ्याला १६ लाखांचा गंडा घातला. धंतोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला.
मनीषा राघव गोडघाटे (रा. पवई मुंबई), कीर्ती अशोक जोशी (रा. बदलापूर ठाणे ) आणि नीलम रमेश अडागळे (रा. बदलापूर, ठाणे) अशी या प्रकरणातील आरोपी महिलांची नावे आहेत.
सर्जिकल साहित्याचे व्यावसायिक मोहन भरतराम तावाडे यांचे धंतोलीत दुकान आहे. ३ जुलै २०२० रोजी त्यांच्याशी उपरोक्त आरोपींनी संपर्क साधला. आमची सर्जिकल साहित्य विक्रीची मोठी कंपनी असून तुम्ही आमच्याकडून साहित्य विकत घेतल्यास तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल, अशी बतावणी आरोपींनी केली. कोणकोणते साहित्य विकतो, त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती तावाडे यांना दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून तावाडे यांनी ऑर्डर नोंदवून आरोपी महिलांना २२ लाख १८ हजार ७४० रुपयांचा चेक दिला. ती रक्कम उचलल्यानंतर आरोपी महिलांनी दोन महिन्यानंतर तावाडे यांना ६ लाख ७७ हजार ७४० रुपयांचे साहित्य पाठविले. नंतर मात्र उर्वरित रकमेच्या बदल्यात ठरल्याप्रमाणे कोणतेही साहित्य पाठविले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. तब्बल सात महिने टाळाटाळ केल्यानंतर आरोपींनी नंतर तावाडे यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे तावाडे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर शनिवारी आरोपी मनीषा गोडघाटे, कीर्ती जोशी आणि नीलम अडागळे या तिघींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी सुरू आहे.
---