योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुदलाने बुधवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मिसाईल्सने हल्ला करत ऑपरेशन सिंदूर राबविले. पाकिस्तानच्या आत असलेल्या मुरिदके येथील ट्रेनिंग कॅंम्पवरदेखील हल्ला करण्यात आला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील अतिरेक्यांना याच ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या हल्ल्यानंतर भारताकडून या भागात कुठलीही थेट कारवाई झाली नव्हती. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने तब्बल १७ वर्षांनी मुंबईकरांच्या जखमांना पाकिस्तानच्या घरात शिरून बदला घेतल्याचेच दिसून येत आहे.
भारतीय वायुसेनेने मुरिदका, मुझफ्फराबाद येथील अतिरेक्यांच्या कॅम्पवर मिसाईल्स डागली. या दोन्ही जागांचा पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून वापर करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्यातील दहाही दहशतवाद्यांना याच जागी प्रशिक्षण मिळाले होते. तत्कालिन चौकशीतदेखील हीच बाब समोर आली होती. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, मानशेरा, मुझफ्फराबाद, अझीझाबाद, या ठिकाणी लष्कर ए तोयबाने दहाही जणांना विविध प्रकारच्या हल्ल्यांचे सविस्तर प्रशिक्षण दिले होते व त्यांनी मुंबईत येऊन १६६ हून अधिक निष्पापांची हत्या केली होती. एका अर्थाने तेथे टार्गेट करून भारताने १७ वर्षांनी मुंबईकरांच्या अस्मितेवर झालेल्या आघाताचा बदला घेतला आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या अहवालात होता मुरिदकेतील ट्रेनिंगचा उल्लेखलष्कर ए तोयबाची स्थापना १९८९ मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात हाफिज सईद व जफर इक्बाल यांनी केली होती. त्याचे मुख्यालय मात्र अनेक वर्ष मुरिदके येथे होते. मुरिदके येथेच एलईटीच्या विविध दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. कसाबला तेथेच अत्याधुनिक शस्त्र, व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विशेष म्हणजे मुरिदके येथील कॅम्पमधूनच दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जायचा.
मुरिदकेतील कॅम्पमध्ये अत्याधुनिक शस्त्रे व सुविधापाकिस्तानकडून मुरिदके येथील दहशतवाद्यांच्या कॅम्पला मोठ्या प्रमाणावर फंडिंग करण्यात येत होते. तेथे दहशतवाद्यांना शारीरिक तंदुरुस्ती, पोहणे, शस्त्रे हाताळणे, गनिमी युद्ध, अत्याधुनिक शस्त्रे-हँडग्रेनेड आणि रॉकेट लाँचरचा वापर, जीपीएस आणि सॅटेलाइट फोन हाताळणे, नकाशा वाचन इत्यादींचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात यायचा. त्यासाठी तेथे तशा सुविधादेखील निर्माण करण्यात आल्या होत्या. अबू फहदुल्लाह, अबू मुफ्ती सईद, अबू अब्दुर्रहमान, अबू माविया, अबू अनीस, अबू बशीर, अबू हंजला पठाण, अबू सरिया, अबू सैफ-उर-रहमान, अबू इम्रान, झाकी-उर-रहमान, हाफिज सईद, काहफा, अबू हमजा हे एलईटीचे मास्टरमाईंड कसाब व इतर दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी मुरिदकेमध्येच होते. मागील १७ वर्षांच्या कालावधीत येथून अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात दहशतवादी कारवायांसाठी पाठविण्यात आले होते हे विशेष.