युवकाचा मृत्यू : भुसावळ-नागपूर पॅसेंजरमधील घटनानागपूर : चालत्या गाडीत बसणे एका युवकाच्या चांगलेच अंगलट आले. तोल जाऊन तो भुसावळ-नागपूर पॅसेंजरच्या चाकाखाली आला आणि कंबरेपासून त्याच्या शरीराचे दोन भाग झाले. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.शेख कासीम शेख बाबु (२२) रा. दर्यापूर अमरावती असे मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या दोन मित्रासह भुसावळ-नागपूर पॅसेंजरने नागपुरात येत होता. सकाळी ९.१५ वाजता भुसावळ-नागपूर पॅसेंजर बुटीबोरी रेल्वेस्थानकावर थांबली. तिघेही मित्र चहा पिण्यासाठी गाडीखाली उतरले. चहा पित असताना गाडी सुटली. कासीमचे दोन्ही मित्र गाडीत चढले. परंतु कासीम चढत असताना गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. गाडीत चढण्याच्या नादात कासीमचा पाय निसटला आणि तो रेल्वेगाडीच्या चाकाखाली आल्यामुळे त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन भाग झाले. तो जखमी होऊन रेल्वे रुळाच्या शेजारी पडल्याचे गाडीच्या गार्डला दिसताच त्याने गाडी थांबविली. लगेच त्याचे दोन मित्र गाडीखाली उतरले. त्यानंतर मागून येणाऱ्या दक्षिण एक्स्प्रेसने त्याला नागपुरात आणण्यात आले. उपचारासाठी त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
चालत्या गाडीत बसणे महागात पडले
By admin | Updated: March 2, 2016 03:17 IST