नागपूर : याकूब मेमनच्यावतीने राज्यपालांकडे करण्यात आलेला दयेचा अर्ज आणि सर्वोच्च न्यायालयात ‘डेथ वॉरंट‘च्या अनुषंगाने केलेली याचिका सर्वत्र चर्चेला आली असतानाच मध्यवर्ती कारागृहात ‘अमरधाम‘ मधील हालचाली तीव्र झाल्या आहेत. राज्यपालांकडे दयेचा अर्ज करतानाच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याकूबने डेथ वॉरंट गैरकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याकूबची फाशी लांबणीवर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे कारागृहात फाशीच्या अंमलबजावणीसाठी धावपळ वाढली आहे. फाशी यार्डातील मैदानात असलेल्या ‘अमरधाम‘ चबुतऱ्यावर सर्व तयारी झाली आहे. चबुतऱ्यावर शेड नव्हते. मात्र, ऐन फाशीच्या वेळीच पाऊस आला तर व्यत्यय येऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे आता चबुतऱ्यावर टिनाचे शेड टाकण्याचेही काम सुरू आहे. कसाबला फाशी देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत येथे याकूबला फाशी देण्यासाठी एक अधिकारी आणि दोन कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले असून, ही टीम ‘डमी‘च्या रूपातील व्यक्तीला रोजच फासावर चढवण्याची रंगीत तालिम करीत आहे. दुसरीकडे बाहेरच्या भागात कारागृहच्या प्रवेश द्वाराच्या दोन्ही दक्षिण आणि उत्तर भागाला दोन पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असून, दोन डझन सशस्त्र जवान २४ तास पहारा देत आहेत. कारागृहाच्या दर्शनी भागातील पार्किंगच्या ठिकाणी असलेली झाडेही कर्मचाऱ्यांनी तोडली.(प्रतिनिधी)मेडिकलचे वरिष्ठ कारागृहात फाशी आणि याकूबच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर, कारागृह प्रशासन वैद्यकीय वरिष्ठांचीही मदत घेत आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास मेडिकलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे कारागृह परिसरात आले. त्यांना पाहाताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली. याकूबच्या संबंधाने प्रश्नांची सरबत्ती झाल्यामुळे त्यांनी आल्या पावलीतच कारागृह परिसरातून माघार घेतली. आपण त्या संबंधाने नव्हे तर कारागृहात शासकीय कामाच्या निमित्ताने आलो होतो. प्रिंटींग मटेरियलचा हा विषय होता, असे सांगून ते कारागृह परिसरातून निघून गेले.
‘अमरधाम’वर हालचाली तीव्र
By admin | Updated: July 24, 2015 02:47 IST