येत्या शुक्रवारी मागितला वैद्यकीय अहवाल
नागपूर : मतिमंद मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी मिळावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मुलीच्या वैद्यकीय तपासणीकरिता तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच, समितीने येत्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत अहवाल सादर करावा असे सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित मुलीच्या पोटात २२ आठवड्यांचा गर्भ आहे. मुलगी ता. देसाईगंज, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबात आई, वडील व चार भावा-बहिणीचा समावेश आहे. ही मुलगी २५ वर्षे वयाची असून ती गर्भवती असल्याचे आशा वर्करना सर्वप्रथम आढळून आले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेले असता ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. त्यामुळे ३ फेब्रुवारी २०२१ रोजी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच, ८ फेब्रुवारी रोजी मुलीला गर्भपाताकरिता नागपूरमधील मेडिकलमध्ये आणण्यात आल्यानंतर यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुलीच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली.
------------------
तेजस जस्टिस फाऊंडेशनचे सहकार्य
गर्भवती मुलीच्या आईला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी तेजस जस्टिस फाऊंडेशनने सहकार्य केले. फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. राजेश नायक व ॲड. नीतेश ग्वालवंश यांनी मुलीच्या आईतर्फे कामकाज पाहिले. मुलीला भरपाई देण्याची विनंतीही न्यायालयाला करण्यात आली आहे.