लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल) : पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली. इंदू रामराव तभाने (६५) असे मृत महिलेचे नाव आहे.शेतीची कामे आटोपून इंदू तभाने व तिचा मुलगा उत्तम हे दोघेही सायंकाळी घरी वापस येत होते. गुरुवारी या परिसरात मुसळधार पाऊस झाला. शेतातून गावात येत असताना मधातच नदी ओलांडून जावे लागते. सायंकाळच्या वेळेला काळेकुट्ट आभाळ असल्यामुळे नेमका नदीतील पाण्याचा अंदाज बैलबंडी चालवीत असलेल्या मुलास आला नाही. शिवाय अचानक नदीतील पाण्याचा ओघ वाढला व मुलगा उत्तम याची बैलबंडी नदीत उलटली. त्या बैलबंडीच्या मागे असलेली त्याची आई बैलबंडी उलटल्याचे पाहून व मुलगा वाहून जात असल्याचे पाहून घाबरली. तिने मुलाला वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. काही कळायच्या आतच तिलासुद्धा पाण्याच्या वेगाने वाहून नेले. उत्तम मात्र समोरच्या एका चिल्हाटीच्या झुडपाला अडकला व बाहेर निघाला. बैलसुद्धा बंडीच्या जुवानीशी बाहेर निघून घरी पळत सुटले. इकडे उत्तम आपल्या आईला शोधू लागला. परंतु शेवटी आई मिळाली नसल्याने धावत येऊन घरच्यांना माहिती दिली. कुटुंब व गावकऱ्यांच्या मदतीने इंदू यांचा शोध घेतला असता घटनेच्या काही अंतरावरच तिचा मृतदेह रात्री ९ वाजताच्या सुमारास आढळून आला.
मुलाला वाचविताना आईचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:34 IST
पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली.
मुलाला वाचविताना आईचा गेला जीव
ठळक मुद्दे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू : कोकर्डा येथील घटना