मौदा : भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा - रामटेक मार्गावर सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.राधिका मधुकर डहाळे (४५, रा. डहाळी) असे मृत आईचे नाव असून, ज्ञानेश्वर मधुकर डहाळे (२६) व संदीप रामकृष्ण डहाळे (११) दोघेही रा. डहाळी, अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे तिघेही एमएच-४०/व्ही-०४५८ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होते. ज्ञानेश्वर हा मोटरसायकल चालवत होता. दरम्यान, मौदा लगतच्या मौदा - रामटेक मार्गावर एनएल-०२/के-९५६८ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, राधिका डहाळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास सहायक फौजदार वानखेडे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपघातात आईचा मृत्यू, मुलगा जखमी
By admin | Updated: March 25, 2015 02:27 IST