गुरूवारपासूनच अंमलबजावणी : रूग्णांच्या नातेवाईकांवर पडणार मोठा बोजादिगांबर जवादे - गडचिरोलीराष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या परवानगीनंतर रक्ताचे सेवा शुल्क जवळपास दुप्पटीने वाढले असून वाढलेल्या दराची अंमलबजावणी गुरूवारपासूनच करण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरचे बिल देताना कंबरडे मोडलेल्या रूग्णाला आता रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. रक्तदात्याकडून रक्त घेतल्यानंतर त्या रक्तावर एड्स, मलेरिया, कावीळ, गुप्तरोग आदी प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्यांचा खर्च वाढला असल्याने रक्ताच्या सेवा शुल्कात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील धर्मदाय संस्था संचालित व खासगी रक्तपेढ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार शासनाने सेवा शुल्कात वाढ केली. मात्र नागपूर येथील द फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार शासनाने १६ सदस्यांची समिती गठीत केली. या समितीच्या शिफारसीनुसार रक्त व रक्त घटक यासाठी आकारण्यात येणाऱ्या सुधारित सेवा शुल्काचा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने नवीन सेवा शुल्कास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने परवानगी दिल्यानंतर रक्तासाठी सुधारित सेवा शुल्क गुरूवारपासूनच राज्यभरात लागू करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तासाठी आता अधिकचे पैसे रूग्णाला मोजावे लागणार आहेत. मात्र रक्त घटकांचे सेवा शुल्क कमी केल्याने रक्त घटकाची आवश्यकता असलेल्या डेंग्यू, मलेरिया, रक्तस्त्राव होणाऱ्या रूग्णांना मात्र दिलासा मिळणार आहे.
रक्तासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे
By admin | Updated: June 22, 2014 00:50 IST