काटोल : काटोल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. प्रत्येक गावात दररोज बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तालुक्यातील कुकडी पांजरा या सहाशे लोकवस्तीच्या गावाला सध्या कोरोनाने घेरले आहे. येथे सध्या ४५ हून अधिक ग्रामस्थ बाधित झाले आहेत. गावात तापाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते सुभाष पोहकार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथक स्थापन करून २३ ते २६ मार्च दरम्यान कोरोना चाचणी अभियान राबविले. यात आतापर्यंत झालेल्या अहवालानुसार ४९ ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. इकडे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास ग्रामस्थांना तातडीने चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कुकडी पांजरा येथे संक्रमण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST