महापौरांचे निर्देश : मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा नागपूर : पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेच्या सर्व झोनमधील नाल्या साफ करा तसेच सर्व नाले, पिवळी नदी, नाग नदी व पोहरा नदीतील गाळ काढण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी दिले. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील आयआरडीपीअंतर्गत येणाऱ्या नाल्या, मोठ्या व लहान नाल्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. काही नाल्याचे सफाई करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित नाल्या साफ करण्याचे काम ५ जूनपूर्वी करण्यात यावे. मोठे नाले व नद्यातील गाळ व कचरा काढण्यासाठी आवश्यकतेनुसार पोकलँड, जेसीबीचा वापर करण्याची सूचना केली. आरोग्य विभागामार्फत दरवर्षी नाले व नद्यातील गाळ काढला जातोे. परंतु हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करा. बंद असलेले पाणी उपसा करणारे पंप दुरुस्त करा. अग्निशमन विभागाने पाणी उपसण्याचे पंप सज्ज ठेवावेत. आपात्कालीन यंत्रणा व उद्यान विभागाचे झाडे तोडणारे पथक झोननिहाय तयार करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे ज्या भागात पाणी साचले होते अशा भागातील नाल्यातील गाळ व कचरा काढण्याच्या कामाला सुरुवात करा. गेल्या वर्षी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी सहायक आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गाळ काढण्यासाठी पोकलँड उतरविण्यासाठी नदी व नाल्याची भिंत तोडली जाते. गाळ व कचरा काढल्यानंतर तोडण्यात आलेली भिंत पूर्ववत बांधण्यात यावी. मान्सूनपूर्व कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी देत मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सर्वे करून नदी व नाल्यांची माहिती घेण्याचे निर्देश दिले. झोन अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभागातील नगरसेवकांसोबत समन्वय ठेवून पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या वस्त्यांची माहिती घेऊ न उपाययोजना करा. तसेच अनधिकृत ले-आऊ टमधील नदी, नाल्यांची सफाई करताना नासुप्र व मनपाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याची सूचना केली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभापती गोपाल बोहरे, सुनील अग्रवाल, देवेंद्र मेहर, बाल्या बोरकर, अपर आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, राहुल वारके, श्याम चव्हाण, सतीश नेरळ, राजेश भूतकर, एन.व्ही. बोरकर, वाहतूक अभियंता कांतीकुमार सोनकुसरे, राजेंद्र उचके यांच्यासह झोन अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी नदी-नाल्यातील गाळ काढा
By admin | Updated: April 21, 2016 03:22 IST