नागपूर : नमाज पठण करून घराकडे निघालेल्या तरुणावर सशस्त्र हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या डोक्यात आणि जबड्यात रुतल्यामुळे इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) हा गंभीर जखमी झाला. गुरुवारी पहाटे ४.४५ ते ५ च्या दरम्यान मोमिनपुऱ्यात ही घटना घडली. यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.इफ्तखार बकरा मंडीजवळ राहातो. नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे तो मशिदीत नमाज पढायला गेला. ४.४५ वाजता मित्र आणि परिचितांशी सलाम-दुवा करीत तो पायीच घराकडे निघाला. पोलीस चौकी नजिकच्या मदनी चिकन सेंटरजवळ अचानक चार आरोपींनी त्याला घेरले. दोघांनी त्याचे हात पकडले तर एकाने त्याच्यावर पिस्तुल रोखले. धडधाकट इफ्तखारने जोरदार प्रतिकार केला. यामुळे झटापट झाल्याने पिस्तुलातून झाडलेली पहिली गोळी त्याच्या शरीराला चाटून गेली. तो जुमानत नसल्यामुळे एका हल्लेखोराने जवळचा चाकू काढून त्याला भोसकण्याचा प्रयत्न केला. इफ्तखारने चाकू घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याच्या हाताला जबर दुखापत झाली अन् त्याची पकडही सैल पडली. त्यामुळे हल्लेखोरांनी दुसरी गोळी डोक्यात तर तिसरी गळ्यावर (कानाखाली) झाडली. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला मृत समजून आरोपी पळून गेले. दरम्यान, ही घटना अनेकांसमोर घडली. त्यामुळे इफ्तखारला उचलून आजूबाजूच्या मंडळींनी वाहनात घातले आणि मेयोत नेले. त्याची प्रकृती लक्षात घेत डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नंतर त्याला धंतोलीतील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्रदीर्घ शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.(प्रतिनिधी)पोलीस चौकीजवळची घटनाया घटनेमुळे मोमिनपुऱ्यात गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच तहसीलचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींबाबत विचारपूस केली असता हल्ला चौघांनी केला. मात्र, त्यांचे साथीदार बाजूला वाहन घेऊन होते, अशी माहिती पुढे आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. आठ ते दहा संशयितांना गुन्हेशाखा आणि तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, पोलीस चौकीजवळच ही घटना घडल्याने तिचे गांभीर्य अधिकच तीव्र झाले आहे. पूर्व वैमनस्यातून घडली घटना हा हल्ला गुन्हेगारांच्या दोन टोळींमधील वादाची परिणती आहे. इफ्तखार हा खतरनाक गुंड इप्पा याच्या टोळीशी संबंधित असून, त्याचे अनेक गुन्हेगारांसोबत सलोख्याचे संबंध आहे. यशोधरानगर परिसरात ४ वर्षांपूर्वी झालेल्या आबिदच्या खुनाच्या आरोपातून तो कोर्टातून निर्दोष सुटला होता. सीताबर्डीतील खुनी हल्ल्यातही तो आरोपी असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. इफ्तखार अलीकडे ‘प्रॉपर्टी डीलिंग‘ करायचा. मात्र, त्याच्या टोळीतील मंडळी क्रिकेट सट्टा, कब्जा, खंडणी वसुली, शस्त्र आणि मादक पदार्थाच्या विक्रीसह अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी आहेत. त्याचे अनेकांशी वैमनस्य आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जाते. भांजाने किया भतिजा का गेम इफ्तखार भतिजा या टोपण नावाने ओळखला जातो. खतरनाक इप्पाला कारागृहाबाहेर काढण्यासाठी तो जुळवाजुळव करीत होता. इप्पा बाहेर आल्यास भतिजाची ताकद पुन्हा वाढणार, खंडणी, जमीन, दुकान बळकावणे आदी प्रकार वाढीस लागेल आणि आपले वर्चस्व कमी होईल, याची कल्पना प्रतिस्पर्धी गुन्हेगारांना होती. त्याचमुळे ‘भांजाने‘ इफ्तखारचा गेम करण्याचा कट रचल्याची आणि त्यासाठी बाहेरून सुपारी किलर बोलविल्याचीही चर्चा इफ्तखारशी संबंधित मंडळी शुअरटेक हॉस्पिटलसमोर करीत होती. त्यांच्या कथनानुसार, रात्रीपासूनच ते इफ्तखारच्या मागावर होते. मात्र, रमजानमुळे मोमिनपुऱ्याचा बाजार रात्रभर फुलला असल्यामुळे त्यांना हे करता आले नाही. त्यामुळे पहाटेच त्यांनी इफ्तखारला गाठले.
मोमिनपुऱ्यात थरार!
By admin | Updated: July 10, 2015 02:58 IST