दीपरंग महोत्सव : स्वानंद संस्थेचे सादरीकरण नागपूर : समाजातील भौतिक सुखांपुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणाईच्या संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकणारे नाट्य म्हणजे ‘क्षण एक पुरे..’ आज अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित दीपरंग नाट्य महोत्सवात सादर करण्यात आले. भावपूर्ण अनुभूतीचे हे नाट्य रसिकांची दाद घेणारे होते. मानवी जीवनातील सर्वच वळणांवर प्रेम, माया, जिव्हाळा या बाबी सुखी व आनंदी जगण्यासाठी अनिवार्य असतात. काही युवकांना मात्र आपल्या गुलाबी प्रेमापुढे घरातील म्हातारी माणसे नकोशी वाटतात. नाना आणि त्याची प्रेयसी तृप्ती यांच्या अनुषंगाने पुढे जाणारे हे नाट्य होते. अंथरुणाला खिळलेले भाऊ, त्यांच्यामुळे उद्भवणारे वाद अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाट्य होते. आईच्या जाण्यानंतर मात्र तृप्तीला जीवनातल्या खऱ्या प्रेमाचे महत्त्व कळते. ती भाऊंचा राग करीत असते पण त्याच भाऊंमुळे नाना तिचा स्वीकार करतो. स्वानंद संस्थेतर्फे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. लेखिका माणिक वड्याळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या भावपूर्ण प्रयोगाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. ऐन तारुण्यात पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता नोकरी सांभाळून घरातील जबाबदाऱ्या निभावणारी, म्हाताऱ्या सासऱ्याची सेवा करणारी सुलभा तर जबाबदाऱ्या नाकारणारी संकुचित मनाची तृप्ती यांच्या वैचारिक विरोधाभासावर हे नाट्य आधारित होते. विकलांग भाऊंची भूमिका श्याम आस्करकर यांनी रसिकांची दाद घेतली. सीमा गोडबोले, स्नेहा अहेर, महेश गोडबोले, विजय अंधारे, आकाश दुधनकर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. संजय काशीकर यांचे अनुरूप नेपथ्य होते. प्रकाशयोजना मिथुन मित्रा यांनी केली. संगीत अनिल इंदाणे, वेशभूषा कल्याणी तपासे तर निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. आर्ट आॅफ अॅक्चींगच्या विद्यार्थ्यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर टी. बी. रमणमूर्ती, इन्फ्रा बिल्डकॉनचे संचालक अर्जुन शहाणे, अर्पित शहाणे, अंजली कदम, लेखक गणेश वडोदकर यांचे स्वागत रमण सेनाड आणि श्रद्धा तेलंग व प्रभा देऊस्कर यांनी केले. (प्रतिनिधी)
भावपूर्ण अनुभूतीचे ‘क्षण एक पुरे...’
By admin | Updated: November 3, 2014 00:43 IST