विकास कामाचे मार्केटिंग करण्यात अपयशनागपूर : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने केलेल्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यात पक्षाला अपयश आल्यानेच लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.जिल्हा विकास योजनेच्या बैठकीनंतर वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अलीकडेच दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस समितीने राज्यातील पराभवाचा आढावा घेतला. या बैठकीला मोघे उपस्थित होते. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, निवडणूक प्रचार काळात मोदींनी प्रसार माध्यमांचा योग्य वापर करीत लोकांना विविध आश्वासने देऊन एक बागुलबुवा तयार केला होता. त्याला बळी पडत लोकांनी मतदान केले. याउलट राज्य शासनाने अनेक चांगल्या योजना राबविल्या. मात्र आम्हाला त्याचे योग्य ‘मार्केटिंग’ करता आले नाही. राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.सध्या प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना बदलण्याचे वारे वाहू लागले आहे. मोघे यांचे नावही नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतले जात आहे. याबाबत मोघेंना विचारणा केली असता अत्यल्प काळासाठी ही धुरा कोण सांभाळणार, असा प्रतिसवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)
प्रदेशाध्यक्षपदासाठी मोघे अनिच्छुक
By admin | Updated: July 1, 2014 00:54 IST