अटल बिहारी वाजपेयी व मनमोहन सिंह यांनीही दिली होती भेट आनंद डेकाटे नागपूर समस्त शोषित, वंचितांची प्रेरणा, ऊर्जा आणि क्रांतिभूमी असलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ तारखेला भेट देणार आहेत. दीक्षाभूमीला भेट देणारे ते तिसरे पंतप्रधान असतील. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला आहे. नागपुरात त्यांचे विविध कार्यक्रम असले तरी खास दीक्षाभूमीसाठीच ते नागपुरात येत आहेत, हे विशेष. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली तर डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली पंतप्रधान असताना दीक्षाभूमीला भेट देऊन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते. याशिवाय उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, रामविलास पासवान, सीताराम येचुरी, सुषमा स्वराज, सत्यनारायण जटीया, चौधरी चुन्नीलाला, सोनिया गांधी, राजीव गांधी, बंगारू लक्ष्मण, डॉ. पद्म सिंह पाटील, एस. एम. कृष्णा, अजित जोगी या राजकीय व्यक्तींसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अशोक सिंघल, ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, स्वामी सत्यानंद, प्रसिद्ध निर्माते डॉ. जब्बार पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीक्षाभूमीला भेटी दिल्या आहेत. सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली दीक्षाभूमीला भेट दिली होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली भेट दिली. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीच्या व्हीजीट बुकमध्ये लिहिलेला संदेश आजही सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीमध्ये केवळ एका ओळीत लिहिलेला ‘सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है.’ हा संदेश ऐतिहासिक असाच आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी सुद्धा इंग्रजीमध्ये अतिशय थोडक्यात पण मार्गदर्शक असा संदेश लिहिला आहे. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीत येणारे मोदी तिसरे पंतप्रधान
By admin | Updated: April 6, 2017 02:09 IST