चिटणीस पार्क : सिनेअभिनेत्री नगमा यांचे प्रतिपादन नागपूर : देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी लोकांना चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी लोकांना मूर्ख बनवले आहे. आता महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी लोकांना मूर्ख बनवायला निघाले आहेत, तेव्हा देश तोडणाऱ्या विचारसरणीपासून सावध राहा, मूर्ख बनू नका, असा इशारा सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि काँग्रेसच्या प्रचारक नगमा यांनी आज येथे दिला. मध्य नागपूर मतदार संघातील काँग्रेस-पीरिपाचे उमेदवार डॉ. अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी चिटणीस पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार, काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभा ओझा, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आ. नदीम जावेद, खा. अविनाश पांडे, राजकुमार पटेल, छत्तीसगडच्या महापौर वाणी राव, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, सुजाता कोंबाडे आदी व्यासपीठावर होते. नगमा म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखविले. परंतु सत्ता येताच त्यांची भाषा बदलली. मोदी पंतप्रधान झाल्यावर महागाई वाढली, जीवनावश्यक औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या. विलास मुत्तेमवार, शोभा ओझा आणि नदीम जावेद यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींसह भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केले. समाजाच्या तोडणाऱ्या विचारसरणीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)विकासासाठी मत द्याभाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकं लोकांची घरे जाळून मतं मागतात तर काँग्रेस लोकांची घरे बनवून मत मागतात, हा दोन विचारसरणीतल फरक आहे. या देशाला, समाजाला तोडणारी विचारसरणी नको तर जोडणारी हवी. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मत द्या, अशी विनंती काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिस अहमद यांनी केली. याप्रसंगी त्यांनी मध्य नागपुरात त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. भाजपचे आमदार गेल्या पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाही. त्यामुळे क्षेत्राचा विकास करण्यासाठी एक वेळ संधी द्या, अशी विनंती त्यांनी केली.
मोदींनी लोकांना मूर्ख बनवले
By admin | Updated: October 13, 2014 01:12 IST