काेंढाळी : मनरेगाच्या कामावर असताना मजुराला विषारी सापाने दंश केला. पुढे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाेडकी येथे रविवारी (दि. २५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
विठ्ठल महादेव तांदळे (६५, रा. दोडकी, ता. काटाेल) असे मृत मजुराचे नाव आहे. दाेडकी ग्रामपंचायतच्यावतीने गावात मनरेगाची काही कामे सुरू करण्यात आली आहे. विठ्ठल त्या कामावर मजूर म्हणून काम करायचे. ते रविवारी दुपारी राेडचे काम करीत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच त्यांना लगेच काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राज्य शासनाने मृत विठ्ठल तांदळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.