नागपूर : अजित पवार यांच्यासोबत गेलेले पक्षाचे आमदार शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतणार, असा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार अनिल देशमुख यांनी सोमवारी केला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यांच्या काटोल मतदारसंघात पक्षाचा एकतर्फी विजय झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला.
ग्रामपंचायत निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, खुशाल बोपचे हे शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आमदारांची इनकमिंग सुरू झालेली आहे. इतर आमदारही लवकरच परत येतील. काही आमदार खासगीत बोलताना सांगतात की, सत्तेचा फायदा घेण्यासाठी ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर ते पक्ष बदलून परत येतील, असा दावाही देशमुख यांनी केला.यावेळी त्यांनी काटोल आणि नरखेड तालुक्यातील बहुतांश जागा राष्ट्रवादीच्या समर्थक उमेदवारांनी जिंकल्याचा दावा केला. त्यांच्या मतदारसंघातील एकूण ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत ५३ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला होता. यापैकी ३८ जागांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विजय संपादन केल्याचा दावा त्यांनी केला. जवळपास ८० टकके जागा आम्ही जिंकत असल्याचेही ते म्हणले. यावेळी जि.प. सदस्य सलील देशमुख उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा, गुलाल उधळत विजयचा आनंद साजरा केला.
इंडिया आघाडीची बैठक नागपुरातच होणार आहे
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हवाला देत देशमुख म्हणाले की, विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक नागपुरात होणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी ही बैठक प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच ही बैठक नागपुरात होणार आहे.