पिपळा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप : घरदुरुस्तीच्या नावावर बांधकामासाठी निधीनागपूर : घरदुरुस्तीच्या नावावर घराचे बांधकामासाठी ग्रामपंचायतने निधी उपलब्ध करून दिला. यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभू भेंडे यांच्यासह इतर दोन सदस्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तर दुसरीकडे निधीचा दुरुपयोग झाला नसून तांत्रिक कारणामुळे आरोप केला जात असल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. हा प्रकार नागपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पिपळा घोगली गटग्रामपंचायतमध्ये घडला. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पिपळा घोगली गटग्रामपंचायतने मीराबाई भालेराव यांना १० टक्के घरदुरुस्ती अनुदान देण्याचे १५ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन मंजूर करण्यात आले. हा ठराव घेतला त्यावेळी तक्रारकर्ते भेडे हे उपसरपंच होते. त्यांच्या अध्यक्षतेखालीच ती सभा घेण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमार्फत कामाचे प्राकलन व तांत्रिक मंजुरी करूनच द्यावे, असे ठरावात नमूद केले आहे. त्यानंतर त्या ठरावानुसार सरपंच वैशाली वानखेडे आणि सचिव वामन ठाकरे यांच्या सहीनिशी ७ मे २०१५ आणि २३ जुलै २०१५ रोजी प्रत्येकी ३० हजार असे एकूण ६० हजार रुपये मंजूर करण्यात येऊन धनादेश देण्यात आला. तो धनादेश लाभार्थ्याकडून वटविण्यात आला. दरम्यान या प्रकाराबाबत खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत मोका चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ठराव घेऊन घरदुरुस्तीकरिता कामाचे प्राकलन तयार करून काम करावे, असे ठरविण्यात आल्याचे समोर आले. मीरा भालेराव यांची ६०० चौ.फूट जागा पिपळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असून नमुना ८ मधील रकाना क्र. ५ मध्ये खाली प्लॉट दर्शविण्यात आले होते. तर नमुना ९ मध्ये मालमत्ता क्र. ११९ वर २०१५-१६ ला एकूण १८० रुपये गृहकर लावण्याचे दिसून आले. हा निधी मंजूर झाला त्यावेळी मासिक सभेत तक्रारकर्त्याने कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. अंदाजपत्रक तरतुदीनुसार लाभार्थ्याच्या घरदुरुस्तीकरिता प्राकलन तयार करून देण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. चौकशी समितीने मोका तपासणी केली असता तेथे सिमेंट, रेती, गिट्टी, विटा, लोहा बांधकाम साहित्य आढळून आले. त्यामुळे बांधकाम नव्याने होत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत लाभार्थी भालेराव यांना समितीने विचारणा केली असता तेथे कवेलूच्या झोपडीत राहत असल्याचे बयाणात सांगितले.सरपंच आणि सचिवांचे बयाणही चौकशी समितीने नोंदविले. त्यात, अंदाजपत्रकानुसारच त्यातही मानवी दृष्टिकोन लक्षात घेऊन विधवा महिलेला निधी मंजूर केल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे म्हटले. मात्र घरकूल दुरुस्तीच्या नावावर घराचे बांधकाम होत असताना शहनिशा न करता दुसरा धनादेश देण्यात आला, असे चौकशी अहवालात नमूद आहे. त्यानुसार सरपंच, सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं.सदस्य प्रभू भेंडे, रंजना बोरकर, वनिता कावळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शासकीय निधीचा दुरुपयोग
By admin | Updated: January 24, 2016 02:59 IST