लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नागपूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी प्रत्यय संस्थेत ३७ लाख रुपयांची अनियमितता समोर आली आहे. २०१५-१६ या कालावधीतील हा प्रकार असल्याचा ठपका संस्थेच्या आमसभेत सादर अहवालात ठेवण्यात आला आहे. तत्कालीन सदस्यांकडून २० लाख ५९ हजार रुपयांची वसुली करण्याची बाब त्यात नमूद आहे. १७ लाख रुपये कमी कसे झाले असा प्रश्न उपस्थित करीत काही सदस्यांनी मोठ्या घोटाळ्याची शंका उपस्थित केली आहे.
विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल खराबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हे प्रकरण जुने असल्याचे सांगितले आहे. मागील चार वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. याचा अहवाल काही दिवसांअगोदरच प्राप्त झाला व संस्थेच्या बैठकीत तो सादर करण्यात आला. अगोदर सादर करण्यात आलेल्या अहवालात उपनिबंधक कार्यालयाने (डीडीआर) तत्कालीन कार्यकारी मंडळावर ३७ लाख ५९ हजार रुपयांची वसुली प्रस्तावित केली होती. त्यानंतर उपनिबंधक कार्यालय शहर-१ ने प्रकरणाची चौकशी करुन तत्कालीन कार्यकारी मंडळाकडून २० लाख ५९ हजार रुपयांची वसुली प्रस्तावित केली आहे. यानुसार कार्यालयातील प्रत्येकाकडून १ लाख ५८ हजार रुपयांची वसुली करण्यास सांगण्यात आले आहे. ही रक्कम तत्काळ संस्थेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे केले नाही तर १२ टक्के व्याज द्यावे लागेल.
सदस्यांना वाटण्यात आली सुटकेस
संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षादरम्यान सदस्यांना अगोदर १२ लाख ७५ हजार रुपयांच्या सुटकेस देण्याचा निर्णय झाला होता. परंतु प्रत्यक्षपणे २१ लाख ९९ हजार ७०० रुपये खर्च करण्यात आले. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर सतीश होले यांच्या सत्कारावर ७७ हजार ९३० रुपये खर्च करण्यात आले. यासह इतर आर्थिक अनियमिततांचा खुलासा अहवालात करण्यात आला आहे.
पूर्ण उत्तरे मिळालीच नाही
संस्थेच्या काही सदस्यांनी दावा केला आहे की ते अनेक वर्षांपासून अनियमिततांविरोधात आवाज उठवीत होते. मात्र त्यांना माहिती दिली जात नव्हती. आता समोर आलेली माहितीदेखील पूर्ण नाही. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. विद्यमान कार्यकारी मंडळाला याची उत्तरे द्यावी लागतील. तसेच जर रकमेची वसुली झाली नाही तर काय पावले उचलण्यात येतील हेदेखील स्पष्ट करावे लागेल. जर ३७ लाख ५९ हजार रुपयांच्या अनियमिततेचे प्रकरण आहे तर मग २० लाख ५९ हजार रुपयांचीच वसुली का होत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.