योगेश पांडे, नागपूर: अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्यामुळे शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच या प्रकरणात पोलिस तक्रार केली होती. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. या एकूण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालयात हा प्रकार घडला आहे. मुख्याध्यापिका डॉ.गीता विकास हरवानी (५०, जरीपटका) यांनी तक्रार केली आहे. तर शाळेतील सचिव राजेश लालवानीसह दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ मे रोजी एका शिक्षिकीने डॉ.हरवानी यांनी शाळेच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली.
लालवानीने यावेळी अल्पसंख्यांक विद्यार्थिनींना प्रवेश देण्यास मनाई केल्याचे तिने सांगितले. ८ मे रोजी एक अल्पसंख्यांक महिला तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी प्रवेश समिती इंचार्जला भेटली. मात्र तिने उच्च प्राथमिक तुकड्यांच्या इंचार्जला भेटण्यास सांगितले. संबंधित शिक्षिकेने शाळेतील जागा भरल्या असून जिथे शिकत आहे, त्याच शाळेत प्रवेश राहू द्या असे सांगितले. महिलेने चौकशी केली असता जागा भरलेल्या नव्हत्या. तिने विचारणा केली असता लालवानीने अल्पसंख्यांक समाजातील मुलींना प्रवेश देण्यास मनाई केल्याचे सांगितले.
एका शिक्षिकेने याचे व्हॉईस रेकॉर्डिंगदेखील केले. डॉ.हरवानी यांनी अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केली. १३ मे रोजी अल्पसंख्यांक आयोगाचे पथक तपासणीसाठी शाळेत आले. त्यांनी अल्पसंख्यांक महिलेचे बयाणदेखील घेतले. त्या पथकाच्या सूचनेनुसार डॉ.हरवानी यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी शाळा सचिव हरवानीसोबतच प्रवेश समिती इंचार्ज व उच्च प्राथमिक तुकडी इंचार्ज असलेल्या दोन शिक्षिकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला