लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने १४ वन प्रकल्प विभागाकरिता व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून त्यास केंद्र शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मंडळाच्या विविध योजनांमधून सागवान, बांबू, शिसव व इतर मिश्र प्रजातींची उत्कृष्ट रोपवने तयार करण्यात आली आहे. मंडळातर्फे एकूण ५ लाख ४६ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय साग बियाणांची आॅनलाईन विक्री त्याचप्रमाणे इमारतीसाठी लागणारे लाकूड, जळावू लाकूड व बांबूची विक्री करण्यात येते. राठोड यांनी यावेळी वनोपज विक्री ई-लिलाव व जाहीर लिलावाद्वारे वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या १५ विक्री आगारांची माहिती घेतली.वन विकास महामंडळातर्फे निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये मोहुर्ली व कोलारा, नागझिरा, पिटेझरी, उमरझरी, बोर तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कोसमतोंडी येथे गृह पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत, याबाबत राठोड यांनी समाधान व्यक्त केले.प्रधान मुख्य वनसंरक्षण व वनबल व वनबलप्रमुख डॉ. सुरेश गौरोला, व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस. के. रेड्डी, मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, श्रीमती एम्तिएन्ला आओ, महाव्यवस्थापक डॉ. ऋषीकेश रंजन आदी यावेळी उपस्थित होते.
वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाबाबत वनमंत्र्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:05 IST