नागपूर : फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे अशा गावात सामाजिक संस्थांचा सहभाग व पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने जिल्हा परिषद मिनरल वॉटर प्रकल्प उभारणार आहे.फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने लोकांना गंभीर आजारांना सामोेरे जावे लागते. भूगर्भातील जलस्रोत प्रदूषित असल्याने नळयोजना राबविताना अनेक अडचणी येतात. अनेकदा लांब अंतरावरुन पाणी आणून नळयोजना राबविणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. मिनरल वॉटर प्रकल्पाच्या माध्यमातून किमान पिण्यासाठी शुद्धपाणी उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केला.दरम्यान जलस्रोत प्रदूषित झालेल्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शहरालगतच्या गावात पाण्याची समस्या गंभीर आहे. या पेरी अर्बन गावांसाठी प्रस्तावित असलेल्या योजना तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वे करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. काही गावातील योजना बंद पडलेल्या आहेत. अडचणी दूर करून त्या पुन्हा सुरू करण्यात येतील. गरज भासल्यास राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ८ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या प्रस्तावांना यापूर्वीच मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)
फ्लोराईडबाधित गावांसाठी मिनरल वॉटर
By admin | Updated: March 22, 2015 02:25 IST