नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आता बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना १.१८ कोटी रुपये परत करणार आहे. याकरिता बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (बीएमए) निरंतर प्रयत्न करण्यात येत होते. एमआयडीसीने पूर्वलक्षी प्रभावाने ईपीएससी चार्ज वाढविला होता. वाढविलेला चार्ज आता परत करण्यात येत आहे.
बीएमए अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल आणि माजी अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या ऑरेंज आणि रेड वर्गवारीच्या उद्योगांकडून पर्यावरण संरक्षण सेवा शुल्क (ईपीएससी) वसूल करण्यात येते. एमआयडीसीच्या ११ डिसेंबर २०२९च्या आदेशानुसार ईपीएससी चार्जेसचा दर प्रतिमहा १० पैशांवरून वाढवून १.१० रुपये प्रतिचौरस मीटर करण्यात आला होता. हा चार्ज पूर्वलक्षी प्रभाव अर्थात १ जानेवारी २०१९पासून करण्यात येणार होता. या चार्जमध्ये दरवर्षी १० टक्क्यांची वाढ होणार होती. यामुळे उद्योगांवर आर्थिक बोजा वाढला होता. ईपीएससी चार्जमध्ये झालेल्या या वाढीचा बीएमएने कठोर विरोध केला होता. त्यामुळेच आता पूर्वलक्षी प्रभावाने वाढविलेला ईपीएससी चार्ज आता उद्योगांना परत मिळणार असून, उद्योगांना एमआयडीसीकडून एकूण १.१८ कोटी रुपये परत करण्यात येणार आहेत.