नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) या कंपनीच्या संचालकांची बैठक १३ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणार असून, मेट्रो रेल्वेच्या विकासाची रूपरेषा बैठकीत ठरणार आहे. मधुसूदन प्रसाद हे कंपनीचे अध्यक्ष तर बृजेश दीक्षित हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. नागपूर मेट्रो रेल्वेची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. ‘एनएमआरसीएल’च्या नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे कंपनी रजिस्ट्रारकडे अर्ज केला होता. नोंदणीआधीच केंद्र आणि राज्य सरकारने नागपुरातील मेट्रो रेल्वे कामाच्या खर्चासाठी मंजुरी दिली होती. काही तांत्रिक बाबींमुळे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीला आधीच उशीर झाला होता, शिवाय कंपनीच्या अध्यक्षपदी प्रसाद हे नव्याने रुजू झाल्यानंतर संचालक मंडळाची फेब्रुवारीमध्ये होणारी पहिली बैठक मार्चमध्ये घेण्यावर निर्णय झाला होता. कंपनीच्या नोंदणीनंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना वेग आला आहे. कंपनीच्या अन्य संचालकांमध्ये मुकुंदकुमार सिन्हा, झांजा त्रिपाठी, वेदमधू तिवारी, शैलेंद्र सिंग, सुबोधकुमार, डॉ. नितीन करीर, श्रावण हर्डीकर आणि श्याम वर्धने यांचा समावेश आहे. प्रकल्पाचे उद्घाटन आॅगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे ३८.१२५ कि़मी.चे दोन कॉरिडोर प्रस्तावित केले आहेत. प्रत्यक्ष काम खापरी येथे लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाला फ्रान्स सरकारची कंपनी (एएफडी) १५०० कोटी रुपये अल्पशा व्याजदरात कर्जस्वरूपात देणार आहे. कंपनीचे तीन अधिकारी तीन दिवसीय दौऱ्यावर १६ मे रोजी नागपुरात येत आहेत. याआधी त्यांनी ३० डिसेंबरला नागपूर सुधार प्रन्यासला भेट दिली होती. पण त्यावेळी प्रकल्पाच्या संथ कामामुळे अधिकारी परत गेले होते. पण बृजेश दीक्षित यांच्या नियुक्तीनंतर प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. हा मेट्रो रेल्वे प्रकल्प देशातील १३ वा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेची रूपरेषा १३ रोजी ठरणार
By admin | Updated: March 11, 2015 02:18 IST