नागपूर : मागील १५ दिवसांपासून असलेले ढगाळलेले वातावरण निवळताच विदर्भातील तापमानाचा पारा पुन्हा चढायला लागला आहे. यामुळे उष्ण तामानामध्येही वाढ झालेली निदर्शनास येत आहे.
मागील १५ दिवसांपासून विदर्भात ढगाळी वातावरण आणि वारे वाहत होते. यामुळे मार्चअखेरीस ४३ अंशावर पोहोचलेले तापमान ३६ ते ३८ अंशाखाली आले होते. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात चांगलाच बदल झाला होता. मात्र, आता पुन्हा पारा चढायला लागला आहे. नागपुरात १.६ अंश सेल्सिअसने वाढ होऊन रविवारी दिवसभरामध्ये ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली. यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच जाणवला. सकाळपासूनच कडक उन्ह होते. आर्द्रता ३० टक्के नोंदविली गेली होती. ती सायंकाळी १७ टक्क्यांवर घटली. दिवसभरातील वातावरणात चांगलाच बदल जाणवत असला तरी सायंकाळी ४ वाजेनंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे परिणाम पडला.
नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चढत असल्याचे दिसत आहे. अकोला आणि वर्धामध्ये ४२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. या दोन्ही ठिकाणी रविवारी सर्वाधिक तापमान होते. बुलडाणा आणि चंद्रपुरात ३९.८ तर गोंदियात ३९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. वाशिममध्ये ३८ अंश तर गडचिरोलीमध्ये ४०.४ अंशावर पारा होता.
...
तापमान वाढणार
विदर्भातील तापमान या आठवड्यात पुन्हा अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत. दोन दिवसांत पारा ४० च्या पुढे गेल्याने आणि वातावरणातही बदल झाल्याने ४५ अंशापर्यंत पारा चढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांची हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली असून आता ती वेग घेत आहेत.
...