लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप नेते नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी तेथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी हे केले असेल त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही संकुचित मानसिकता असून एक प्रकारे बुरसटलेले तालिबानी विचार आहेत. हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली, असं सांगता. हे कितपत योग्य आहे, असा सवालदेखील फडणवीस यांनी उपस्थित केला.