मिसेस सीएमने घेतली दखल : २० सफाई कर्मचाऱ्यांची मदत नागपूर : मनुष्यबळ कमी असल्याची गाऱ्हाणी मांडून अस्वच्छतेच्या संदर्भात मेडिकल प्रशासन नेहमीच हात वर करीत असते. परंतु मिसेस सीएम सत्वशिला चव्हाण यांनी एक दिवसाची मेडिकलला भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाई कामावर नाराजी तर व्यक्त केली. परंतु उपाययोजना म्हणून सोमवारी २० सफाई कर्मचाऱ्यांची चमूही पाठवून दिली. यामुळे येत्या आठवड्यात मेडिकल चकाचक दिसणार आहे.मिसेस सीएम यांनी मेडिकलची पाहणी केली तेव्हा जागोजागी पडलेला कचरा आणि दुर्गंधीवर नाराजी व्यक्त केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ५० टक्के कर्मचारी कमी असल्याची माहिती दिली. मिसेस सीएम निघून गेल्या. सफाईचा मुद्दा कायम होता. परंतु त्यांनी पुणे येथील भारत विकास ग्रुपचे २० सफाई कर्मचाऱ्यांच्या चमूला मेडिकलला पाठविले. या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या सफाई कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या पद्धतशीर सफाईमुळे मेडिकलच्या सफाई कर्मचाऱ्यांनीही कौतुक केले. यासंदर्भात माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले, मिसेस सीएम यांनी ही चमू पाठविली आहे. पुण्याहून आलेली ही चमू साधारण सात दिवस मेडिकलमध्ये साफ-सफाई करणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात मिळालेली ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मेडिकल होणार चकाचक!
By admin | Updated: July 8, 2014 01:21 IST