नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीसह पाच बंदिवानांना कोरोनाची लागण झाल्याने शुक्रवारी सकाळी मेडिकलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी शरीरातील ऑक्सिजनचा स्तर व इतरही चाचण्या सामान्य आल्याने पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. यांच्या संपर्कात आलेल्या १५ बंदिवानांची गुरुवारी तपासणी करण्यात आली असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात, ३० जून रोजी कारागृहातील ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. नंतर कोरोनाची लागण बंदिवानांनाही झाल्याने याची संख्या ७५वर पोहोचली. प्रशासनाने बाधित बंदिवानांसाठी कारागृहातच कोविड केअर सेंटर निर्माण करून उपचार सुरू केले. काहींना मेयोमध्ये भरती करण्यात आले. सप्टेंबरनंतर रुग्ण नसल्याने हे सेंटर बंद करण्यात आले. परंतु बुधवारी गवळीसह पाच बंदिवानांमध्ये लक्षणे आढळून येताच त्यांची चाचणी करण्यात आली. यात हे पाचही पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी या सर्वांची मेडिकलमध्ये तपासणी करण्यात आली. कारागृहातील डॉक्टरांनुसार यांच्या संपर्कात आलेल्या आणखी १५ बंदिवानांची चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.