मेडिकल : मानसोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:09 AM2020-01-31T00:09:34+5:302020-01-31T00:10:14+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला.

Medical: Approval for Psychology Postgraduate Courses | मेडिकल : मानसोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी

मेडिकल : मानसोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मंजुरी

Next
ठळक मुद्देपीजीच्या चार जागा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (पीजी) ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस’ने मान्यता दिल्याचा ई-मेल गुरुवारी धडकला. तब्बल ११ वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. या विषयात आताचार ‘पीजी’च्या जागेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचार तज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे. तीन लाख लोकांमागे एक मानसोपचार तज्ज्ञ आहे, असे असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) १७ मधून केवळ दोनच वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार विषयात ‘पीजी’ अभ्यासक्रम सुरू आहे. यात मराठवाडा, विदर्भातील महाविद्यालयाचा समावेश नाही. यामुळे ग्रामीण भागात नावालाही मानसोपचार तज्ज्ञ मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे. यासाठी मेडिकलने पुढाकार घेत संबंधित विषयात ‘पीजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नाना सुरुवात केली. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या अभ्यासक्रमासाठी लागणारे निकष म्हणजे, एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक, एक निवासी डॉक्टर व ३० खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अधिष्ठातापदाची जबाबदारी डॉ. सजल मित्रा यांच्याकडे येताच त्यांनीही विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे गेल्याच वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या आणि नंतर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने निरीक्षण केले. गुरुवारी मानसोपचार विषयात पीजी अभ्यासक्रमाला मंजुरी दिल्याचा मेल धडकताच मेडिकलमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. हा अभ्यासक्रम खेचून आणण्यास अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह विभाग प्रमुख डॉ. प्रशांत टिपले व सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

२००९ पासून सुरू होते प्रयत्न
मेडिकलमध्ये २००९ मध्ये मानसोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचा प्रस्ताव ‘एमसीआय’ पाठविला होता. परंतु त्यावेळी या विषयाचे प्राध्यापक हे पदच नसल्याने ते बारगळले. २०१४ मध्ये प्राध्यापक व इतरही पदे मिळाली. तेव्हापासून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता.

मानसोपचारतज्ज्ञाची संख्या वाढेल
विविध कारणांमुळे मानसिक आजाराचा रुग्णांची संख्या वाढत आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनात मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नाला सुरूवात झाली. अखेर मंजुरीचा ई-मेल प्राप्त झाला. येत्या वर्षात या अभ्यासक्रमासाठी चार जागेवर प्रवेश दिला जाईल. यामुळे भविष्यात मानसोपचार तज्ज्ञाची संख्या वाढून रुग्णांना याचा फायदा होईल.
डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल

 

Web Title: Medical: Approval for Psychology Postgraduate Courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.