नागपूर : रेल्वे स्टेशनजवळील उभारण्यात येत असलेल्या रामझुल्याच्या कामाला गती यावी, यासाठी महापौर अनिल सोले यांनी मंगळवारी आमदार व मनपा पदाधिकारी यांच्यासमवेत भेट देऊन रामझुल्याच्या कामाचा आढावा घेतला.रामझुल्याच्या एकूण ५४ पैकी ५० केबलचे काम पूर्ण झाले आहे. जयस्तंभ चौकाकडून जाणाऱ्या रामझुल्याला दोन केबल जोडण्याचे काम सुरू आहे. रामझुला टप्पा अॅप्रोच जोडणी व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सोले यांनी दिल्या. मेयो हॉस्पिटलकडून अॅप्रोच रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी सुरू आहे. विद्युतीकरणाचे काम लवकरच केले जाणार आहे. या भागातील काँक्रिटचे काम सुरू आहे. तसेच अॅटीक्रॉश बेरियर दोन्ही बाजूच्या भिंतीचे काम प्रगतिपथावर आहे. ते आठवडाभरात पूर्ण केले जाईल. तसेच २८ सप्टेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती प्रोजेक्ट मॅनेजर अरुण कुमार यांनी दिली. काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सोले यांनी केल्या.यावेळी आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, कर आकारणी समितीचे सभापती गिरीश देशमुख, जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे, आरोग्य समितीचे रमेश शिंगारे व नगरसेवक प्रकाश तोतवानी यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापौरांनी केली रामझुल्याच्या कामाची पाहणी
By admin | Updated: September 3, 2014 01:17 IST