लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न करण्याची थाप मारून एका उच्चशिक्षित तरुणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पुण्यातील एका अभियंत्यावर तरुणीने बलात्काराचा आरोप लावला. सीताबर्डी पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत घेतल्याने आता त्याला उपरती झाली आहे. परिणामी त्याने तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांकडे विनाशर्त लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते. गाैरव जगनानी (वय २८) असे त्याचे नाव असून, तो पुण्यात एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे.
तक्रार देणारी तरुणी (वय २८) उच्चभ्रू कुटुंबातील असून, उच्चशिक्षित आहे. ती खासगी नोकरी करते. मॅट्रिमोनियल साइटवर तिची आरोपी गाैरवसोबत ओळख झाली होती. एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी एकमेकांची घरेही बघितली. सर्व व्यवस्थित वाटल्याने लग्नाची बोलणी करण्यात आली. नंतर मात्र गाैरवने लग्नासाठी ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची अट घातली.
दरम्यान, गाैरवने तरुणीशी सीताबर्डीच्या हॉटेलमध्ये १५ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान बोलवून घेतले. एका धार्मिक ठिकाणी तिच्यासोबत लग्न आटोपून घेतले अन् शरीरसंबंध प्रस्थापित करून पुण्याला निघून गेला. त्याने नंतर तिला टाळणे सुरू केल्याने तरुणीने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. हुंड्यासाठी लग्न मोडून बलात्काराच्या गुन्ह्यात गाैरवला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. भविष्य अंधकारमय दिसत असल्याने त्याने तरुणीसोबत ‘झाले गेले विसरून जा. आता लग्न करू’, असा प्रस्ताव ठेवल्याचे समजते.
पुढे काय होणार?
त्याचा प्रस्ताव मान्य झाला तरी गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाल्याने या प्रकरणात पुढे काय होणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे. पोलीस या संबंधाने स्पष्ट बोलण्याचे टाळत आहेत.