दिवाळीत खरेदीची धूम : दागिने व ब्रॅण्डेड वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कलनागपूर : दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, नवी आशा, नवा हुरूप दिसत आहे. महागाई वाढली असली तरी त्याची कुठलीही छाया दिवाळीच्या खरेदीवर पडली नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. कपड्यांपासून दागदागिन्यांपर्यंत, फर्निचरपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतच्या विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीत सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम आहे. बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात पाय ठेवायला जागा नाही. रांगोळ्या, आकाशदिवे, मातीचे दिवे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. धनत्रयोदशीला नवीन वाहन घरी नेण्यासाठी ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी दिसत आहे. फटाक्यांची दुकानेही शहरात सजली आहेत. उल्लेखनीय म्हणजे काही नवीन प्रकारचे प्रदूषणमुक्त फटाके यंदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अनिरुद्ध भांडारकर यांनी सांगितले की, दिवाळीला चार दिवस उरले आहेत. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी येत आहेत. एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन आदींसह लोकांना ब्रॅण्डेड वस्तू हव्या आहेत. विविध आॅफर्ससह फायनान्सची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढली आहे. यंदा दिवाळीत उत्साह असून अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे.ए.के. गांधी समूहाचे अशोककुमार गांधी यांनी सांगितले की, सर्व वस्तूंना चांगली मागणी आहे. आॅनलाईन खरेदीमुळे व्यवसायावर थोडाफार परिणाम झाला आहे. पण शोरूममध्ये जाऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा दिसून येत आहे. फायनान्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसे पाहता ग्राहक रोजच दिवाळी साजरी करतात. गुणवत्तेच्या उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. दिवाळीत अपेक्षेपेक्षा चांगली विक्री होत आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि घरगुती उपकरणांवर ग्राहकांचा जास्त भर आहे. खंडेलवाल ज्वेलर्स आणि साडीचे संचालक राजेश खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदा दिवाळीत विक्री चांगली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दागिन्यांसह साड्यांना जास्त मागणी आहे. ग्राहक कुटुंबीयांसह खरेदीसाठी येत आहेत. ग्राहकांना फायनान्सचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. अल्ताफ एच वलीचे संचालक अल्ताफ वली यांनी सांगितले की, शोरूममध्ये विविध कंपन्यांचे कॅमेरे आणि एक्सेसरीजच्या विक्रीला जास्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या कॅमेरा सेन्सारचा तुटवडा आहे. पण लोकांनी बुकिंग करून ठेवले आहे. ब्रॅण्डेड वस्तू खरेदीसाठी लोक उत्सुक आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता शोरूममध्ये जाऊन वस्तू हाताळून खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा दिसून येत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता जास्त स्टॉक करावा लागत आहे. यंदा दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
बाजारपेठा हाऊसफुल
By admin | Updated: October 27, 2016 02:15 IST